धुळे जिल्हा संपूर्ण माहिती || Dhule District Information
06 Apr, 2024
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. तापी नदी ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे.
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा. धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ.किमी आहे. जिल्ह्याची सिमा पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.
या जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष १०,५५,६६९ महिला ९,९२,११२ असे प्रमाण आहे. जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी या भाषा बोलल्या जातात. धुळे जिल्ह्यात सोनगीर, नरडाणा,बोराडी , सांगवी, थाळनेर, पिंपळनेर, कुसुंबा, अर्थे, निजामपूर, दुसाणे, म्हसदी, मालपुर, कासारे, दहिवेल व कापडने ही महत्त्वाची गावे व उपनगर आहेत
जिल्ह्याचे तापमान कमाल ४३° सेल्सियस तर किमान ४° सेल्सियस इतके असून सरासरी पाऊस ६०० मिमी. इतका पडतो.
जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत.धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी(खान्देशी) बोली बोलल्या जातात.
लळिंग किल्ला, पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यावर लळिंग किल्ला आहे लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर, देवपूरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे, शिरपूरचे बिजासन (विंध्यावासिनी) देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर, तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.
धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे धुळे जिल्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत झाली आहे.काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.
धुळे (धुळे शहर): –
तापी व पांझरा किनारी वसलेल्या धुळे व प्रकाशा वसाहतीच्या अलीकडील सर्वेक्षणात अश्मयुगीन मानवाच्या आस्तित्वा विषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रकाशा येथील उत्खननामध्ये आढ्ळून आलेल्या इ.स. पुर्व ४ थ्या व ३ ऱ्या शतकातील काच व मातीच्या वस्तूवरून ते अशोक मौर्य या सम्राटाच्या कालखंडातील असल्याचे सिद्ध होते.
पितळ खोरा येथील लेण्यांमधील शिलालेखांवरील उल्लेखांवरून सातवाहन वंशाची राजधानी पैठणशी या प्रदेशाचे करार असल्याने सिद्ध होते. इ.स. ३१६-३६७ दरम्यान खान्देशावर स्वामिदास मुलुंड व रुद्रदास यांची सत्ता असल्याने पुरावे महाराज रुद्रदास यांच्या दस्तऐवजांवरून व काही तोकड्या व अविश्वसनीय सामग्रीवरून समजते. पाचव्या शतकाच्या मध्य्मामध्ये दक्षिणेकडे वातापी (बादामी) आणि खान्देश या प्रदेशांवर चालुक्य राजा पुलकेशी १ याने आपले साम्राज्य सेन्द्रकांच्या मदतीनी स्थापित केले. मेहुणबारे जि.जळगाव येथे शके ६२४ (A.D ७०२) तांम्रपंत्रानुसार शेवटच्या सेन्द्रक राजा विरदेव यांच्याकडून राष्ट्रकुटांच्या अधिपत्या खाली आले. राष्ट्रकुल राज्यांच्या उतरत्या काळात बऱ्याच लहान सहान संस्थानी यादवांशी मिळून धुळे प्रांतावर राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु १३ व्या शतकाच्या शेवटी यादवांनी आपली सत्ता येथे स्थापन केली. १२९४ अल्लाउद्दिन खिलजी ने खान्देशावर आक्रमण करून यादवांची सत्ता संपवली. इ.स १३१८ मध्ये हिंदू देवगिरी साम्राज्याचा अंत झाला. इ.स १३७० पर्यंत खान्देश खिलजीच्या अधिपत्याखाली राहिला. याच वर्षी थाळनेर व करवंदी सुबा सुलतान फिरोज तुघलक याने मलिक रझा फारुकीला बहाल केले.त्याच दरम्यान “देवपूर” व “जुने धुळे ” या ठिकाणी दोन गढयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, त्यापैकी देवपूरची गढी सन १८७२ च्या पांझरा नदीला आलेल्या भीषण पुरात वाहून गेली. इ.स.१६२९ पर्यंत अकबर बादशाहाने खान्देश विशेष करून ‘धुळे ’ वर आपल अधिपत्य स्थापित केले.
इ.स १७२३ मध्ये मुघल सरदार निझाम उल हक याने मुघल राजवटी विरुद्ध बंड केले. त्याचा मृत्यू १७९८ ला झाला. १७५२ मध्ये मराठ्यांनी निझामाचा बाल्की येथे पराभव केला तेव्हा त्याचा मुलगा ‘सलामत जंग’ हा निझाम होता. बाल्कीच्या तहा अंतर्गत खान्देशचा पूर्ण प्रदेश मराठा साम्राज्याचा अधिपत्याखाली आला जो पुढे १८१८ पर्यंत राहिला. सन १८०३ च्या दुष्काळात खान्देश प्रांताचे रुपांतर वाळवंटात झाले. पुढील काही वर्षात बालाजी बळवंत या विठ्ठल नरसिह विंचूरकर यांच्या विश्वस्थ्याने ‘धुळे ’ परत बसविले. त्या बदल्यात विंचूरकरानी त्यांना विशेष अधिकारासह जमीन इनाम म्हणून दिल्या. सोबतच देवपूर गढीची डागडुजी करून जुने धुळे येथे ‘गणेशपेठ’ बसविली. पुढे बाळाजी बळवंत यांच्या वर सोनगीर व लळिंग या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ती त्यांनी इ.स. १८१८ पर्यंत ब्रिटीश राजवट लागू होई पर्यंत निभावली. १८१९ साली ‘कॅप्टन ब्रीज्ज’ याने ‘धुळे ‘ चे केंद्रीय स्थान व हिंदुस्थानला जोडणारा दुवा म्हणून ‘धुळे’ आपले मुख्यालय म्हणून स्थापन केले. शहर नदी नाल्यांनी वेढलेले व लहान होते व ३ भागात विभागलेले होते. जुने धुळे, देवपूर आणि मोगलाई. नवे धुळे व पेठ ज्याला पूर्वी ब्रीज्ची पेठ म्हणून ओळखले जात होते, यांची निर्मिती कॅप्टन ब्रीज्ज याने केली. शहर अनेक समांतर गल्ल्यानी बनलेले होते. मुंबई आग्रा रोड हा तिसरा काटकोन रस्ता अस्तित्वात होता.
बुऱ्हानपूर हून व्यापारी तसेच मुंबई व सुरत हून हुशार कारागीर, सुतार व लोहारांना शहरात वसविण्यात आले आणि तीन कार्यालये बांधण्यात आली. धुळे शहर परत एकदा समृद्धी च्या मार्गावर अग्रेषित झाले.
इ.स १९०६ साली प्रशासकीय सुविधेसाठी खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन विभाग करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये धुळे सहित नंदुरबार, नवापुर, पिंपळनेर, शहादा, शिरपूर, शिंदखेडा व तळोदा तालुके समाविष्ठ करण्यात आले.
१८८७ साली पिंपळनेर तालुक्याचे मुख्यालय साक्री येथे हलवून त्याचे नाव साक्री तालुका ठेवण्यात आले. १९५० साली अक्कलकुवा हा नवीन तालुका अस्तित्वात आला.१५ ऑगस्ट १९०० धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरु झाली.
१९६० साली धुळे जुने बॉम्बे राज्यातून वेगळा होऊन महाराष्ट्राचा भाग बनले. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. धुळे जिल्ह्यात आता धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर हे चार तालुके आहेत. तसेच १ मे २०१६ रोजी धुळे शहर, पिंपळनेर व दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालयांची स्थापना करण्यात आली.